जमिनीच्या माती परीक्षणाची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर जेमतेम दहा ते पंधरा टक्के एवढेच शेतकरी आपल्या शेतातील मातीचे परीक्षण करून घेतात आणि त्यापैकी पाच ते दहा टक्के शेतकरीच माती परीक्षणानुसार व त्यांच्या शिफारशीनुसार रासायनिक खते तसेच सेंद्रिय खते यांची नियोजन करून त्या पिकास अंमलबजावणी करतात.
माती परीक्षणाचे महत्व आणि त्याचे पिक उत्पादनामधले फायदे याचे आकलन अद्यापही शेतकरी वर्गामध्ये दिसून येत नाही. बहुतांश शेतकरी आपल्या शेतातील पिकांना स्वतःच्या मर्जीप्रमाणे किंवा आपल्या शेजारच्या शेतकऱ्याने कोणती खते किती प्रमाणावर टाकलेली आहेत याचे निरीक्षण करून किंवा कृषी विकास केंद्रातील दिलेल्या माहितीनुसार त्या त्या पिकाला अंदाजे खते दिली जातात. परंतु त्यामुळे असे होते की एखाद्या पिकाला लागणारा नत्र ,स्फुरद, पालाश यांच्या मात्रांची माहिती नसल्याने अनेक वेळा ती अधिक प्रमाणावर किंवा कमी प्रमाणावर दिले जातात आणि त्यामुळे ज्यादा खते दिली तर एकूणच भांडवली खर्च वाढतो आणि कमी दिले तर त्या पिकास लागणाऱ्या खतांच्या योग्य मात्रा न दिल्याने त्या पिकाचे उत्पादन कमी आल्याचे आपल्याला आढळते.
आणि म्हणून आपल्याला माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे असते तसेच जमिनीचा सामू (पीएच)किती आहे) हे आपणास माहीत नसते कृषी उत्पादनामध्ये जमिनीच्या सामुलाअत्यंत महत्त्व आहे. शास्त्रीय पद्धतीने आपण त्याचा विचार केला तर चांगल्या जमिनीमध्ये पीएच हा साडेसहा ते साडेसात पर्यंत असणे आवश्यक आहे, अशा जमिनीमध्ये सर्व प्रकारची पिके चांगल्या पद्धतीने वाढुन त्यांचे उत्पादन चांगले मिळते परंतु जेव्हा जमिनीचा पीएच हा साडेसातच्या वर गेला तर जमीन ही क्षारयुक्त आणि चोपण होण्यास सुरुवात झालेली असते आणि अशा वेळेला आपण कितीही चांगल्या पद्धतीने जमिनीची मशागत केली त्यामधील पिकांना भरपूर प्रमाणामध्ये रासायनिक खते दिली तरीसुद्धा पीएच वाढल्यामुळे त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे आपल्याला आढळून येते व उत्पादन जेमतेम किंवा कमी आल्याचे आढळून येते.
जमिनीचा पीएच हा साडेसहाच्या खाली आल्यानंतर जमीन ही विम्ल युक्त स्वरूपामध्ये गेलेली आपल्याला आढळते आणि अशाही वेळी आपण किती चांगली मशागत केली चांगल्या पद्धतीने रासायनिक खते दिली तरीसुद्धा त्या क्षेत्रातून अपेक्षित असलेले उत्पादन आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे आहे.
दुसरी बाब म्हणजे जमिनीत उपलब्ध असणारा सेंद्रिय कर्ब हा एक घटक पीक उत्पादनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. शास्त्रोक्त पद्धतीने आपण विचार जर केला तर जमिनीमध्ये 0.5 ते 1% पर्यंत सेंद्रिय कर्ब उपलब्ध असणे गरजेचे असते. ज्यावेळी एक टक्क्यापर्यंत सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये उपलब्ध असेल त्यावेळेला जमिनीमधील सूक्ष्म जिवाणूंची संख्या सुद्धा आपल्याला वाढलेली आढळते सूक्ष्म जीवाणू म्हणजे अझटोबॅक्टर , ऍसिटोबॅक्टर पीएसबी, रायझोबियम इत्यादी जिवाणू हे मोठ्या संख्येने या स्थितीत आपल्याला आढळून येतात. जमिनीतील वरील जिवाणूंची संख्या जेवढी मोठी तेवढेच पिकाचे उत्पादनही आपल्याला मोठ्या प्रमाणावर निघालेले आढळून येते.
जमिनीतील जिवाणूंचा आपण जर विचार केला तर हे जिवाणू हवेतील नत्र शोषण करून शेतातील पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात म्हणजेच वरून देण्यात येणाऱ्या नत्रयुक्त रासायनिक खतांची मात्रा ऑटोमॅटिक कमी होते व व त्यांचा वापरही योग्य पद्धतीने होतो .
तसेच रायझोबियम या पद्धतीच्या जिवाणूंची वाढ व संख्या सुद्धा चांगली असलेली आपल्याला आढळते. हे जिवाणू द्विदल वनस्पतींच्या मुळासोबत राहुन जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरणाचे काम करतात आणि यांचा सुद्धा द्विदल वनस्पतींच्या उत्पादनामध्ये मोठा वाटा आहे.
त्याचबरोबर पीएसबी म्हणजेच जमिनीतील स्फुरद विरघळवणारे जिवाणू यांची सुद्धा उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळून येते हे जिवाणू जमिनीत असलेले स्फुरद यांची उपलब्धता वाढवून ते पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम करतात.
हे वरील तिन्ही प्रकारचे जिवाणू म्हणजे अझटोबॅक्टर, ऍसिटोबॅक्टर ,रायझोबियम व पीएसबी यांचे जमिनीतील प्रमाण आपल्याला जमिनीतील सेंद्रिय कर्बावरून ठरवता येते म्हणून माती परीक्षणाला अत्यंत महत्त्व देणे गरजेचे आहे.
माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला जमिनीत असणारे नत्र, स्फुरद व पालाश यांचे प्रमाण किती आहे याची माहिती कळते. एखाद्या पिकाला रासायनिक खताच्या मात्रा द्यायच्या जर असतील आणि आपण जर माती परीक्षण केले नसेल तर वरून देणाऱ्या रासायनिक खताच्या मात्रा या कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे त्या पिकास ती खते योग्य प्रमाणात न मिळाल्याने त्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो.खतांचे अधिक प्रमाण झाल्यास शेतकऱ्यास अधिकचा भांडवली खर्च येतो आणि कमी खतांचा वापर केल्यास त्या पिकास लागणारे अन्नघटक योग्य प्रमाणात न मिळाल्याने पिकाच्या उत्पादनात घट येते आणि म्हणून माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
माती परीक्षण करताना जमिनीचा प्रातिनिधीक स्वरूपाचा माती नमुना घेताना काही गोष्टी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्या म्हणजे जमिनीचा चढ उतार कसा आहे त्याचबरोबर त्या जमिनीची खोली व पोत याचे वर्गीकरण करूनच माती नमुना घेने गरजेचे आहे.
माती परीक्षण करताना पुढील गोष्टी विचारात घेणे अत्यंत गरजेचे आहे
१) शेताच्या बांधाजवळील किंवा झाडाखालील माती नमुना घेऊ नये
२) शेतात जनावरे शेळ्या मेंढ्या बांधण्याच्या ठिकाणचा माती नमुना घेता कामा नये.
३) मातीचा नमुना पिकांची काढणी झाल्यानंतर आणि शक्यतो उन्हाळ्यामध्ये शेत नांगरण्यापूर्वी घेणे अत्यंत गरजेचे असते
४) विहिरी शेजारील सखल भागातील माती नमुना घेऊ नये
५) शेतामध्ये पिकांना रासायनिक खते जर टाकलेली असतील तर अशावेळी दोन ते अडीच महिने त्या शेतातील माती नमुना घेऊ नये
६) वेगवेगळ्या प्रकारच्या मातीचे किंवा वेगवेगळ्या शेतातील मातीचे नमुने एकत्र करून त्याचा नमुना तपासणीसाठी पाठवू नये.
या वरील बाबी मातीचा नमुना घेताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
माती नमुना प्रत्यक्ष कसा घ्यायचा –
- प्रत्यक्ष शेतात गेल्यानंतर ज्या ठिकाणचा माती नमुना घ्यायचा आहे त्या ठिकाणचा जमिनीच्या पृष्ठभागावरील काडीकचरा ,दगड ,गोटे बाजूला करून त्या ठिकाणी एक फूट बाय एक फूट या आकाराचा चौकोनी खड्डा आखून घ्यायचा व या ठिकाणी कुदळीच्या किंवा टिकावयाच्या साह्याने एक फूट खोलीचा निमुळत्या आकाराचा, इंग्रजी V आकाराचा खड्डा आपल्याला घ्यायचा आहे त्यातील माती बाजूला काढून मग त्या खड्ड्याच्या निमुळत्या दोन्ही बाजू खुरप्याच्या सहाय्याने दोन ते तीन सेंटीमीटर जाडीचा मातीचा थर तासून घ्यायचा आहे, ती तासलेली व खड्ड्यात पडलेली माती आपण बाजूला काढून बाहेर एका प्लास्टिकच्या घमेल्यात एकत्र करून चांगली मिक्स करावी ओली असल्यास एखाद्या गोणपाटावर सावलीमध्ये वाळवून घ्यावी .व मग त्यातील अर्धा किलो पर्यंत माती एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरावी.
- या माती भरलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्या माती नमुन्याची माहिती असणारा कागद परिपूर्ण भरून घडी करून ठेवायचा आहे आणि मग पिशवीचे तोंड बांधून तो मातीचा म्हणून माती परीक्षण प्रयोग शाळेमध्ये पाठवायचा आहे.
- माती नमुन्याचा माहितीचा फॉर्म भरताना त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव ,गाव ,तालुका व जिल्हा याची माहिती भरावी तसेच त्या जमिनीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर याची माहिती भरायची तसेच ती जमीन बागायती आहे किंवा जिरायती आहे ही माहिती भरायची त्यानंतर त्या जमिनीमध्ये पूर्वी कोणते पीक होते व आता कोणते घ्यायचे आहे याचीही माहिती भरायची तसेच पूर्वीच्या पिकास कोणती रासायनिक खते दिली होती याचा तपशील देणे गरजेचे आहे जमिनीचा पोत हा हलका आहे मध्यम आहे का भारी आहे ही सुद्धा माहिती भरून व माती नमुन्याचे प्रातिनिधिक क्षेत्र टाकून माती नमुना घेतलेल्या ची तारीख नमूद करून ती चिठ्ठी घडी करून त्या मातीच्या नमुन्याच्या पिशवीमध्ये ठेवणे गरजेचे आहे.
- माती परीक्षणाचा तपासणीनंतरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जमिनीत उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून व त्या अहवालानुसार वरून देणारी सेंद्रिय खते किंवा रासायनिक खते किती प्रमाणात द्यायची याचा तपशील खाली देत आहे.
जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरुन खतांचा वापर
अन्नद्रव्यांचे प्रमाण | सेंद्रिय कर्ब (%) | जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये (किलो/हे.) | खतांची शिफारस | ||
नत्र | स्फुरद | पालाश | |||
अत्यंत कमी | ०.२० पेक्षा कमी | १४० पेक्षा कमी | ७ पेक्षा कमी | १०० पेक्षा कमी | शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५० टक्के जास्त |
कमी | ०.२१-०.४० | १४१-२८० | ८-१४ | १०१ - १५० | शिफारशीत खत मात्रेपेक्षा २५ टक्के जास्त |
मध्यम | ०.४१-०.६० | २८१-४२० | १५-२१ | १५१ - २०० | शिफारशीत खतमात्रा |
थोडे जास्त | ०.६१-०.८० | ४२१-५६० | २२-२८ | २०१ - २५० | शिफारशीत खतमात्रा |
जास्त | ०.८१-१.० | ५६१-७०० | २९-३५ | २५१ - ३०० | शिफारशीत खत मात्रेपेक्षा २५ टक्के कमी |
अत्यंत जास्त | १.० पेक्षा जास्त | ७०० पेक्षा जास्त | ३५ पेक्षा जास्त | ३०० पेक्षा जास्त | शिफारशीत खत मात्रेपेक्षा ५० टक्के कमी |
माती परीक्षण अहवालानुसार वरील तक्त्याचा उपयोग करून अन्नद्रव्यांचे वर्गीकरण करावे व त्यानुसार खतांची मात्रा द्यावी.
– श्री.दयानंद बनसोडे
Bsc.Agri.
निवृत्त कृषी अधिकारी