
महाराष्ट्रातील शेतीचा आणि शेतकऱ्याचा सध्याचा विचार करता अनेक कारणांनी शेती हि प्रभावित झालेली आपल्याला आढळून येते ज्यामुळे शेतीतील उत्पादन आणि एकूण उत्पन्न यावर त्याचा परिणाम झालेला आढळून येतो. त्याची प्रमुख कारणे खालील प्रमाणे :
१) सध्याची शेतकऱ्यांकडील जमीन धारणा
२) आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव
३) नैसर्गिक आपत्ती
४) शेतमाल साठवणुकेच्या तंत्रज्ञानाचा अभाव
५) प्रभावी विपणन व्यवस्थेचा अभाव
६) अपेक्षित बाजारभावाची कमतरता
१) सध्याची शेतकऱ्यांकडील जमीन धारणा :
महाराष्ट्रातील शेती व्यवसायाची सद्यपरिस्थिती पाहिली तर, शेतकऱ्याची उत्पन्नाबाबत बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे दिवसेंदिवस कुटुंबाच्या विभाजनामुळे जमिनींचे सुद्धा विभाजन झालेले आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी आजोबा पंजोबांकडे असलेली ५०-१०० एकरांची जमीन आता पुढच्या सध्याच्या पिढीकडे २-४ एकरांवर आलेली आहे.
पूर्वी मोठी जमीन असल्याने व जरी एकरी उत्पादन कमी मिळत होते तरी, एकत्रित क्षेत्र मोठे असल्याने त्या कुटुंबास एकूण मिळणारे पिकाचे उत्पादन हे खूप जास्त होते आणि त्या उत्पादनावर त्या कुटुंबाच्या गरजा सहज भागल्या जायच्या कारण मुळात गरजाच कमी असल्याने अतिरिक्त होणार खर्च टाळला जाऊन त्या पैशाचा कुटुंबाच्या प्रगतीला हातभार लागला जात होता. आत्तासारखे दुचाकी, चारचाकी वाहने तसेच टीव्ही, मोबाईल, फीज, इत्यादींची आवश्यकता त्याकाळी फार लागत नव्हती त्यामुळे मिळालेल्या उत्पादनावर ते कुटुंब सुखी व समाधानी होते. जसजशी लोकसंख्या वाढत गेली तसतसे कुटुंबाचे व जमिनीचे हि विभाजन होत गेले , तसेच उपलब्ध साधन सामुग्रीचे सुद्धा विभाजन होऊन पायाभूत सुविधा या विभागल्या गेल्या त्यामुळे जमीन धारणा कमी कमी होत जाऊन त्याचा त्या कुटुंबांवर परिणाम होऊ लागला. विभाजित झालेल्या कुटुंबाला मर्यादित शेतीतून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नापासून कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. विभाजित झालेली शेती हि एका ठिकाणी नसते ती अनेक सर्वे नंबर मध्ये छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि आशा तुकड्यांमधील शेती दळणवळणाच्या गैरसोईमुळे तसेच मशागतीस येणाऱ्या अडचणीमुळे ती कसणे अवघड होत आहे. तसेच सिंचनाच्या सुविधा- विहिरी, शेततळी, बोअरवेल इत्यादी पूर्वी एकत्र होत्या परंतु शेती विभाजनामुळे त्यातील पाण्याच्या वापराच्या कुटुंबा-कुटुंबांमध्ये वाटण्या पडलेल्या आहेत त्यामुळे ते पाणी आळीपाळीने वापरावे लागते आणि अशावेळी एखाद्या कुटुंबास पिकाला पाणी देण्याची गरज असूनसुद्धा वेळेत पाणी देता येत नाही त्यामुळे मिळणाऱ्या उत्पादनावर त्याचा वाईट परिणाम दिसून येतो. अनेक ठिकाणी शेतीचे छोटे छोटे तुकडे असल्याने त्याठिकाणी जाण्या – येण्याच्या गैरसोईंमुळे व सिंचनाच्या सोई योग्य प्रकारे नसल्याने हे जमिनींचे तुकडे अनेक ठिकाणी पडीक राहिलेले आपणांस आढळून येतात. या अशाकारणांमुळे एकंदरीत कुटुंबाच्या उत्पादनात घट आलेली आढळते.
सध्या कुटुंबांच्या वाढत्या गरजा, आधुनिकतेकडे व भौतिक सुखाकडे धावणारी सध्याची लोकांची मानसिकता यामुळे मर्यादित जमिनीतून योग्यप्रकारे कुटुंब चालविणे शेतकऱ्याला अवघड झाले आहे.
– श्री.दयानंद बनसोडे
Bsc.Agri.
निवृत्त कृषी अधिकारी