३ ) नैसर्गिक आपत्ती –
भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास 65 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी अगदी कितीही चांगल्या प्रकारे शेती करत असला तरी काही नैसर्गिक बाबी अशा आहेत की त्यामुळे शेतीवर त्याचा वाईट पद्धतीने प्रभाव होतो आणि शेती उत्पादनामध्ये फार मोठी घट येते. याचे एक उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यात शेतकरी हा आपल्या शेताची पूर्वमशागतीची कामे करतो शेती नांगरतो,कुळवतो चांगल्या प्रकारे तयार करून ठेवतो आणि जून मध्ये पडणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाची वाट पाहत बसतो . खरीप मध्ये नैऋत्य मोसमी पाऊस हा वेळेवर सुरू होऊन शेतामध्ये योग्य प्रकारे पेरणी करता येईल आणि त्याचे उत्पादन चांगले होईल या आशेवर शेतकरी बसलेला असतो परंतु अलीकडच्या काळात आपल्याला असे पाहायला मिळते की,नैऋत्य मोसमी पाऊस हा सात जूनला सुरू होण्याऐवजी जूनचा मध्य किंवा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तो सुरू होतो काही वेळेस अगदी जुलैमध्ये ही सुरू होतो आणि अशा वेळेला खरीप मध्ये वेळेवर पेरणी होणे आवश्यक असताना सुद्धा खरिपाच्या पेरण्या उशिरा होतात आणि त्यामुळे पिकांची वाढ योग्य प्रकारे न झाल्याने खरिपाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
काही वेळेस असेही आढळून आलेले आहे की अख्खा खरीप हंगाम पावसाविना गेलेला आपल्याला आढळून येतो आणि त्यामुळे संपूर्ण खरीप मधील पिकांचे मोठ्या प्रमाण नुकसान होते आणि त्याचा फटका हा शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांस होतो.त्याचबरोबर रब्बी हंगामात सुद्धा जो परतीचा मान्सून आहे व त्याचा रब्बी मधील पिकांच्या पेरणीसाठी किंवा वाढीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो तो देखील पाऊस लहरी परिपणामुळे वेळेवर पडत नाही त्यामुळे सुद्धा रब्बीची पेरणी वेळेवर होत नाही किंवा असा पाऊस जरी पडला तरी तो एकसमान न पडता काही ठिकाणी मोठा तर काही ठिकाणी अगदी तुरळक पणे पडतो आणि त्यामुळे रब्बी हंगामावर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. मराठवाडा विदर्भ या भागामध्ये मुख्यत्वे रब्बीची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात आणि अशा लहरी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होऊन ज्वारी गहू हरभरा यासारख्या पिकावर त्याचा अनिष्ट परिणाम होऊन उत्पादनात घट येते. काही वेळेस पीक जोमात येते त्या पिकाची वाढ चांगली झालेली असते अगदी ते पीक काढणीच्या अवस्थेत असते आणि अशाच वेळी अचानक अवकाळी पाऊस सुरू होतो चक्रीवादळे होतात व चांगले आलेले पीक शेतकऱ्यांच्या हातातून निष्टुन जाते. शेतकऱ्यांच्या हातातोंडी आलेला घास हिरावून घेतला जातो. काही वेळेस पीक जोमात असते पक्व होण्याच्या अवस्थेत असते आणि त्याला थोड्याफार पाण्याची आवश्यकता असते आणि याच वेळेला पावसाचा मोठा खंड पडून त्या पिकाला आवश्यक असणारे पाणी न मिळाल्याने ते पीक पक्व होत नाही व त्याचा परिणाम पीक उत्पादनावर होऊन त्यामध्ये मोठी घट येते.
अलीकडे आपण पाहतो अचानकपणे हवामानांमध्ये बदल होतो अनेक ठिकाणी ढगाळ आद्रता युक्त हवामान झाल्याचे आपणास आढळते आणि अशा वेळेला शेतामध्ये असलेल्या पिकावर अनेक प्रकारच्या किडी व रोग यांचा प्रादुर्भाव झालेला आढळतो या किडीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होऊन उत्पादनामध्ये घट येते. काही वेळेस नैसर्गिक रित्या महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये टोळधाडी सारख्या किडींचा प्रादुर्भाव झालेला आढळतो आणि या किडीमुळे त्या त्या भागातील पिकांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आपल्याला आढळते.त्याचबरोबर दमट हवामानामुळे नैसर्गिक रित्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पिकावर होतो आणि त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठी घट येते. काही वेळेस काही भागांमध्ये अति थंडी पडते तर काही भागांमध्ये अतिउष्ण हवामान असते आणि या विषम वातावरणामुळे पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊन पीक उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आढळून येते.
महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये अतिवृष्टी ही नैसर्गिक आपत्ती प्रत्येक वर्षी आपल्याला आढळून येते त्याच्यामुळे खरीप मधील पीक असो किंवा रब्बी हंगामातील पीक असो या अतिवृष्टीमुळे या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आपल्याला आढळते. हाता तोंडाशी आलेली पिके या अतिवृष्टीमुळे नष्ट होऊन किंवा त्यांच्या वाढीवर परिणाम होऊन पिकांच्या होणाऱ्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आढळून येतो.
तसेच अतिवृष्टीमुळे ओढ्या नाल्यांना, नद्यांना आलेल्या महापुरामुळे पिकांचे नुकसान तर होतेच परंतु जमिनीची धूप सुद्धा मोठ्या प्रमाणावर झालेले आपल्याला आढळते. शेतीचे बांध फुटून शेतातील माती वाहून जाते, छोट्या छोट्या ओघळी शेतात पडलेल्या आढळतात आणि त्यामुळे शेतात असणारी चांगली माती ही वाहून जाऊन त्या ठिकाणी छोट्या-मोठ्या आओघळी पडलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर उंच भागाकडून मुरूम,वाळु, गोटे हे वाहून आल्यामुळे जमिनीच्या चांगल्या मातीवर यांचे थर बसतात आणि चांगली जमिन खराब झालेली आपणास आढळते अशा प्रकारच्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी शेतातील बांधबंधिस्ती, छोटे -मोठे तलाव शेततळी हे फुटून त्यांचे नुकसान होते व अशा फुटलेल्या बांधबंधिस्तीमुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होते आणि एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मातीचे चांगले थर वाहून जातात व चांगल्या जमिनी या अनुत्पादीत झालेल्या आपणास आढळून येते. तसेच शेतात असणारे पाण्याचे स्रोत विहिरी, शेततळी, बोरवेल यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन पाणी साठ्यावर अनिष्ट परिणाम होतो तसेच शेतातील मोठमोठी झाडे, फळबागा या नुकसानग्रस्त झालेल्या आपल्याला आढळतात.
अशा प्रकारच्या अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे प्रामाणिकपणे शेतात राबणारा शेतकरी हा भरडला जातो आणि त्याला मोठा फटका बसून उत्पादनात घट येते.
– श्री.दयानंद बनसोडे
Bsc.Agri.
निवृत्त कृषी अधिकारी