आपण शेत जमिनीचा विचार केला असता जमिनीचा जो वरचा थर आहे ज्याची खोली साधारण दोन ते तीन फुटापर्यंत आहे, या थरातील माती पिकांच्या वाढिसाठी योग्य समजली जाते. या मातीच्या थरामध्ये लाखो प्रकारचे जिवाणू उपलब्ध असतात. त्यातील काही ठराविक जीवाणू पिकांच्या वाढिसाठी उपयुक्त असतात.
हे जिवाणू हवेतील नत्र शोषण करून जमिनीमध्ये साठवून ठेवतात ,तर काही जिवाणू सहजीवी पद्धतीने द्विदल वनस्पतींच्या मुळावर राहून हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात आणि पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध करून देतात, तर काही जिवाणू जमिनीमध्ये पडून राहिलेला स्फुरद व पालाश यांच्यावर प्रक्रिया करून ते उपलब्ध करण्याचे काम करतात .
अशा प्रकारचे जिवाणू जे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत हे जिवाणू शास्त्रीय पद्धतीने जमिनीतून वेगळे करून त्यांच्या वर्गवारीनुसार ,कृत्रिमरीत्या प्रयोगशाळेत वाढवले जातात व असे तयार केलेले जिवाणू बीज प्रक्रियेसाठी वापरले जातात.
बीजप्रक्रिया करून पेरणी केली असता पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे आढळून आलेले आहे.आणि अशा सर्व प्रकारच्या जिवाणूंना जिवाणू खते असे म्हटले जाते.
जिवाणू खतांचे प्रकार –
१) ऍझोटोबॅक्टर-
हे जिवाणू सर्व प्रकारची तृणधान्य उदाहरण, ज्वारी ,बाजरी, गहू, मक्का, भात तसेच ऊस सर्व प्रकारची फळपिके व भाजीपाला पिके ,काही प्रकारच्या फळभाज्या या सर्व एकदल पिकांच्या मुळाभोवती राहून हे जिवाणू हवेतील मुक्त नत्र शोषण करून जमिनीमध्ये स्थिर करण्याचे काम करतात. आणि हा स्थिर केलेला नत्र मुळांच्याद्वारे शोषण करून त्यांचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो यामुळे प्रतिवर्षी जमिनीमध्ये साधारण 20 ते 25 किलो/हेक्टर जमिनीमध्ये स्थिर केला जातो आणि याच्यामुळे साधारणपणे 25% नत्रयुक्त खतांची बचत केली जाते व 10 ते 35 टक्के पर्यंत उत्पादनात वाढ झालेली आढळते.
२) रायझोबियम जिवाणू-
या प्रकारचे जिवाणू हे द्विदल वनस्पतींच्या किंवा कडधान्यांच्या मुळावर गाठीच्या स्वरूपात सहजीवी पद्धतीने वास्तव्य करतात व हे जिवाणू हवेतील नत्र शोषण करून मुळांना उपलब्ध करून देतात त्यांचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी चांगल्या प्रकारे होऊन सर्वसाधारणपणे वर्षाकाठी 50 ते 200 किलो नत्र प्रती हेक्टरी जमिनीमध्ये स्थिर केला जातो, ज्याचा वापर मुळाद्वारे पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये चांगल्या प्रकारे होऊन साधारण दहा ते पंधरा टक्के उत्पादन वाढलेले आढळते.
३) ऍसिटोबॅक्टर जिवाणू-
या प्रकारचे जिवाणू ऊस आणि तत्सम शर्करायुक्त पिकामध्ये उपलब्ध असतात हे जिवाणू आंतरप्रवाही असल्याने उसाच्या कांड्यामध्ये शिरकाव करून सर्व पेशी मध्ये वास्तव्य करतात. हे जिवाणू सुद्धा हवेतील मुक्त नत्र शोषण करून उसांच्या पेशीमध्ये सरळ स्थिर केला जातो आणि हा स्थिर केलेला नत्र पिकांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असून उत्पादनात वाढ झाल्याचे आपल्याला आढळते.
या जिवाणूमुळे उसामध्ये 40 ते 45% नत्राचा पुरवठा केला जातो आणि उसाचे एकरी उत्पादन 10 ते 15 टक्क्यांनी वाढले जाते.
४) स्फुरद विरघळणारे जिवाणू-
पिकांचे उत्पादन घेताना आपण ज्यावेळी स्फुरदयुक्त खते जमिनीत टाकतो त्या खतांपैकी फक्त दहा ते पंधरा टक्केच स्फुरद पिकांच्या वाढीसाठी शोषला जाऊन त्यांचा उपयोग केला जातो परंतु जवळपास 85 ते 90 टक्के स्फुरद जमिनीमध्ये कॅल्शियम फॉस्फेट किंवा आयर्न अल्युमिनियम या स्वरूपात कठीण आणि अविद्राव्य स्वरूपात जमिनीत पडून राहिलेला आढळतो आणि या स्फुरदचा पिकांच्या वाढीसाठी काहीही उपयोग होत नाही.आणि म्हणून हाच अविद्रव्य स्फुरद विरघळवून त्याचे रूपांतर उपलब्ध स्वरूपात या जिवाणूमुळे केले जाते व जमिनीतील सर्व उपलब्ध स्फुरद पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होतो. यामुळे 25 ते 30 टक्के स्फुरदयुक्त खतांची बचत होऊन उत्पादनात 15% पर्यंत वाढ होते.
५) अझोस्पिरिलियम-
हे जिवाणू तृणधान्य व भाजीपाला पिकांच्या मुळामध्ये व मुळाभोवती सहजीवी पद्धतीने राहतात व हवेतील नत्र शोषण करून मुळांच्याद्वारे पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध करून देतात,यामुळे सुद्धा उत्पादनात वाढ झालेली आढळते.
जिवाणू खतांचा वापर करण्याची पद्धत.
जिवाणू खते ही पावडर स्वरूपामध्ये किंवा द्रव स्वरूपामध्ये उपलब्ध आहेत. बियाणे पेरण्यापूर्वी पावडर स्वरूपात असलेली जिवाणूखते वापरताना दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम जिवाणू खते या प्रमाणात घेऊन, प्रथमता हे बियाणे ताडपत्रीवर किंवा प्लास्टिकच्या घमेल्यामध्ये घेऊन त्यावर गुळाचे पाणी बियाणे ओलसर होण्यासाठी थोड्या प्रमाणावर शिंपडतात व हे जिवाणू खत बियाण्याला चोळून घेतात हे चांगल्या प्रकारे मिसळून घेतल्यावर एका गोणपटावर हे बियाणे सावलीमध्ये सुकवण्यासाठी ठेवतात साधारण 15 ते 20 मिनिटांनी हेच बियाणे पेरणीसाठी घेऊन शेतामध्ये त्याची पेरणी केली जाते. अशाच पद्धतीने द्रव स्वरूपातील असणारे जिवाणूंचे द्रावण तयार करून भाजीपाला पिके किंवा फळभाज्या यांची रोपे लागवड करण्यापूर्वी त्यांची मुळे या द्रावणामध्ये दहा मिनिटे बुडवून ती लागवडीसाठी घेतात.
उसाच्या लागवडीसाठी ऍसिटोबॅक्टर, अझोटोबॅक्टर, पीएसबी व के एस बी या प्रकारचे जिवाणू खते प्रत्येकी एक एक लिटर घेऊन अर्धा बॅरल पाण्यामध्ये (१००ली.) हे सर्व जिवाणू खते चांगल्या पद्धतीने मिक्स करून या द्रावणामध्ये उसाच्या कांड्या साधारण दहा ते पंधरा मिनिटे बुडवून मग ऊस लागवडीसाठी घेतल्या जातात.
जिवाणू खते याबाबत घेतली जाणारी दक्षता.
१) जिवाणूं खतांची साठवणूक सावलीतच करावी तसेच यांचे सूर्यप्रकाश आणि उष्णता यांच्यापासून संरक्षण करावे.
२)जिवाणूंची बीजप्रक्रिया केलेले बियाणे रासायनिक खताबरोबर किंवा औषधाबरोबर मिसळू नयेत.
३) बुरशीनाशकांची आणि कीटकनाशकांची बियाण्यास अगोदर बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतरच बियाणे सुकल्यानंतर पुन्हा जिवाणू खतांची बीज प्रक्रिया करावी.
४) रायझोबियम यासारख्या जिवाणूंचे पिकनिहाय वेगवेगळे प्रकार आहेत,त्या त्या पिकांनुसारच त्यांचा वापर केला जावा.
५) जिवाणू खते असलेल्या पाकिटावर त्याची अंतिम तारीख दिलेली असते त्या तारखे अगोदरच या जिवाणू खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
६) महत्त्वाचा सल्ला- जिवाणू खते ही रासायनिक खतांना पर्याय नसून ती एक पूरक म्हणून वापरली जातात.
– श्री.दयानंद बनसोडे
Bsc.Agri.
निवृत्त कृषी अधिकारी